श्री महालक्ष्मी मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ५१ हजार पणत्यांचा दीपोत्सव
श्री महालक्ष्मी मंदिर सारसबाग तर्फे पुष्परंगावलीतून सूर्यनमस्कारांचे रेखाटन

पुणे : आकर्षक रंगातील पणत्यांसह हजारो दिव्यांची आरास, विविध रंगातील फुलांची सजावट आणि पुष्परंगावलीतून सूर्यनमस्कारांचे रेखाटन सारसबागेजवळील श्री महालक्ष्मी मंदिरात करण्यात आले. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त मंदिरात आयोजित दीपोत्सवात तब्बल ५१ हजार दीप प्रज्वलित करण्यात आले.

श्री महालक्ष्मी मंदिर सारसबागतर्फे या सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी ट्रस्टचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अॅड.प्रताप परदेशी, भरत अग्रवाल, डॉ.तृप्ती अग्रवाल यांसह विश्वस्त, पदाधिकारी व भाविक मोठया संख्येने उपस्थित होते. विश्वकर्मा विद्यालय व विश्वकर्मा युनिर्व्हसिटी यांचे शिक्षक व विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी संयोजनात सहभाग घेतला.

अमिता अग्रवाल म्हणाल्या, सूर्यनमस्कार हा सर्वांगिण व्यायाम आहे. सूर्यनमस्कारामुळे आपले आरोग्य चांगले राहते आणि आपल्या स्मरणशक्तीचाही विलक्षण विकास होतो. त्यामुळे यंदा सूर्यनमस्कार हे पुष्परंगावलीतून साकारण्यात आले. तसेच विविधरंगी दीप प्रज्वलित करुन संपूर्ण मंदिराप्रमाणे समाजातील अज्ञानरुपी आणि विकाररुपी अंध:कार दूर व्हावा, अशी प्रार्थना देखील मातेचरणी करण्यात आली.



