बाथरूममध्ये शिरले, आमचे इनरवेअर… तरुणींचे पुणे पोलिसांवर खळबळजनक आरोप – शशिकांत पाटोळे

Pune : कोथरुड पोलिसांवर गंभीर आरोप केली जात आहेत. हेच नाही तर मोठे आंदोलन देखील करण्यात आले. पीडित मुलींनी थेट पोलिसांवर गंभीर आरोप केले असून गुन्हा नोंदवण्यासाठी रात्री साडेतीनपर्यंत आंदोलन सुरू होते.
पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात धक्कादायक प्रकार घडलाय. तीन दलित मुलींचा छळ पोलिसांनी केल्याचा आरोप करण्यात आला. छत्रपती संभाजीनगरमधील एक महिला आपल्या पतीच्या जाचाला कंटाळून पुण्यात आली. यानंतर त्या महिलेला मदत करणाऱ्या मुलींच्या घरी पोलिस पोहोचले. तब्बल पाच तास पोलीस स्टेशनमध्ये आपल्याला मारहाण करण्यात आली, शेरेबाजी करत जातीय शिवीगाळ केल्याचा आरोप त्या तीन पीडित मुलींनी केलाय.
माध्यमांना बोलताना एका पीडितेने म्हटले की, पोलिस आमच्या घरात शिरले. ते आम्हाला नको नको ते बोलत होते. कोणत्याही प्रकारचे वॉरंट नसताना त्यांनी आमच्या घरात प्रवेश केला. फक्त बेडरुमच नाही तर ते आमच्या बाथरूममध्येही शिरले. पोलिसांनी आमच्या बाथरूममध्ये जाऊन चक्क आमच्या इनरवेअर तपासल्या. आम्हाला घाण घाण शिव्या देत होते. पूर्ण बेडरूम त्यांनी तपासली.
तब्बल पाच तास पोलिसांनी आमचा छळ केला
आम्ही त्यांना याबद्दल जाब विचारताच पोलिस स्टेशनला चला…आम्ही दाखवतो, असे म्हणत धमक्या दिल्या. पीडित तीन मुलींनी पोलिसांवर गंभीर आरोप केली आहेत. मात्र, अजूनही पोलिसांकडून कोणत्याही प्रकारचा गुन्हा हा दाखल करण्यात आला नाहीये. पीडित मुलींना न्याय मिळून देण्यासाठी आमदार रोहित पवार, वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी पुणे पोलीस आयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन केले.
मुलींच्या आरोपानंतरही गुन्हा दाखल नाहीच
काही तास आंदोलन करूनही पुणे पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याने अखेर रात्री साडेतीनच्या सुमारास पीडित मुली या घरी परत गेल्या. या प्रकरणात पोलिसांनी त्यांची भूमिका देखील स्पष्ट केली आहे. पोलिसांकडून सांगण्यात आले की, ॲट्रॉसिटी कायद्यानुसार एखादी घटना सार्वजनिक ठिकाणी घडली की, आपण गुन्हा हा दाखल करू शकतो. मात्र, हे प्रकरण पोलीस स्टेशनमधील एका खोलीत घडले आहे. आंदोलनकर्त्यांकडून या प्रकरणात पुढे नेमकी काय भूमिका घेतली जाते हे पाहण्यासारखे ठरणार आहे. मात्र, मुलींच्या आरोपानंतर मोठी खळबळ उडाली आहे.