वाहननिर्मिती क्षेत्रात देश जागतिक स्तरावर अग्रस्थान मिळवेल – केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी
प्राज' इंडस्ट्रीजच्या वतीने 'प्राज बायोव्हर्स' या जागतिक उपक्रमाची घोषणा

डॉ. प्रमोद चौधरी यांच्या प्रेरणादायी प्रवासावर आधारित ‘होरायझन्स बियॉन्ड ड्रीम्स… अॅज इज व्हॉट इज’ या इंग्रजी पुस्तकाचेही मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन
पुणे, : वाहननिर्मिती, संशोधन व डिझाईन या क्षेत्रातील देशाची गतिमानता आणि गुणवत्ता पाहता, नजीकच्या भविष्यात वाहननिर्मिती क्षेत्रात देश जागतिक स्तरावर प्रथम क्रमांक मिळवेल, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केले. मी मंत्री झालो, तेव्हा आपण जगात ७ व्या क्रमांकावर होतो, आज आपण तिसऱ्या स्थानी आहोत, असेही ते म्हणाले. जागतिक जैवइंधन दिनानिमित्त सेनापती बापट रस्त्यावरील हॉटेल जे डब्लू मॅरिएट येथे आयोजित एका विशेष कार्यक्रमात प्राज इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांनी ‘प्राज बायोव्हर्स’ या जैव अर्थव्यवस्थेशी संबंधित जागतिक उपक्रमाची घोषणा केली, त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असताना गडकरी बोलत होते. डॉ. प्रमोद चौधरी यांच्या प्रेरणादायी प्रवासावर आधारित ‘होरायझन्स बियॉन्ड ड्रीम्स… अॅज इज व्हॉट इज’ या इंग्रजी पुस्तकाचेही मान्यवरांच्या हस्ते अनावरण यावेळी करण्यात आले.
केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्राज इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी, टोयोटा किर्लोस्कर मोटर्सचे उपाध्यक्ष विक्रम गुलाटी, हिरो मोटोकॉर्पच्या ऑपरेशन्स विभागाचे कार्यकारी संचालक विक्रम कसबेकर, किर्लोस्कर ब्रदर्सचे व्यवस्थापकीय संचालक संजय किर्लोस्कर, विश्वकर्मा पब्लिकेशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सोनी आणि प्राजच्या बायो-एनर्जी विभागाचे अध्यक्ष अतुल मुळे हे याप्रसंगी उपस्थित होते.
भारतामध्ये अन्नधान्याची निर्मिती वाढली आहे, ते ठेवण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. काही वर्षांपूर्वी मक्यापासून इथेनॉल तयार करण्यास सुरुवात झाली, त्यानंतर मक्याच्या दरात चांगली वाढ झाली. बिहार मधल्या शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा झाला. त्याचप्रमाणे अन्य धान्याचा वापर करून इथेनॉल तयार केले गेले तर त्याचा शेतकरी वर्गाला चांगला फायदा होऊ शकतो. आपल्याकडे ज्या ठिकाणी पडीक जमीन आहे, तिथे बाबूंची लागवड करून त्यापासून इथेनॉल तयार केले तर प्रदूषणाचा प्रश्न सुटण्यास देखील चांगली मदत मिळू शकते, इतकेच नाही तर त्यामधून चांगल्या प्रकारची रोजगार निर्मिती होऊ शकते असे गडकरी यांनी नमूद केले.
डिझेलमुळे मोठ्या प्रमाणात प्रदूषणा होते, त्यावर पर्याय म्हणून आपसोमिथेनॉल हा चांगला पर्याय आहे, भविष्य काळात तो देशासाठी वरदान ठरणार आहे. भारतामध्ये चांगल्या प्रकारचे संशोधन सुरु आहे, त्यामुळे भारत आत्मनिर्भर होण्यास वेळ लागणार नाही. डॉ प्रमोद चौधरी यांनी इथेनॉल क्षेत्रात केलेले काम मोठे असून त्याची सुवर्णाक्षरांनी नोंद करण्याची गरज असल्याचे गडकरी म्हणाले.
‘प्राज बायोव्हर्स’ या उपक्रमाविषयी माहिती देताना प्राज इंडस्ट्रीजचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी म्हणाले, “प्राज बायोव्हर्स ही संपूर्ण जैव अर्थव्यवस्थेच्या परिसंस्थेला एकत्र आणणारी चळवळ आहे. याद्वारे जैव अर्थव्यवस्थेशी संबंधीत अनेकविध घटक एकत्र येण्यासोबतच नवोपक्रमांना चालना देणे, एकमेकांना आवश्यक सहकार्य करणे, प्रेरणा देणे आणि ज्ञानाची देवाणघेवाण वाढविणे अशा पद्धतीने एकत्रितपणे काम केले जाईल. याद्वारे आपण देशासोबतच जागतिक पातळीवर देखील शाश्वत विकासासाठी नवीन क्षितिजे शोधू शकू असा आम्हाला विश्वास आहे.”
संजय किर्लोस्कर, विक्रम गुलाटी, विक्रम कसबेकर आणि विशाल सोनी यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. अतुल मुळे यांनी आभार मानले. चैतन्य राठी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले