मराठी
रामेश्वर (रूई), जि. लातूर येथे साकारले विश्वधर्मी मानवता तीर्थ भवन

डॉ. एस. एन. पठाण
माजी कुलगुरू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, नागपूर,
माजी उपाध्यक्ष, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद, भारत सरकार, नवी दिल्ली,
सल्लागार, विश्वशांती केंद्र (आळंदी), पुणे, भारत.
डॉ. एस. एन. पठाण, महाराष्ट्र राज्याचे माजी उच्च शिक्षण संचालक, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू, तर अखिल भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे (ख.उ.उ.ठ. न्यू दिल्ली) उपाध्यक्ष व एक ज्येष्ठ शिक्षणतज्ञ म्हणून सार्या या महाराष्टाला सुपरिचित आहेत.
समाजात सामाजिक सलोखा रहावा व ज्ञानेश्वर माऊलींचा ‘आता विश्वात्मक देवे‘ हा संदेश जगामध्ये जावा म्हणून गेली अनेक वर्षे ते विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या बरोबर ‘सांप्रदायिक सद्भावाच्या‘ कार्यात सतत अग्रेसर आहेत व यावर त्यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत, विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांनी रामेश्वर (रुई) जि. लातूर येथे ‘विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन साकारले असून त्यावर प्रकाश टाकणारा हा त्यांचा लेख.
सर्व जगात एकच धर्म असावा म्हणजे धार्मिक संर्घष होणार नाही, असे काही विचारवंतांना वाटते. त्यामुळे सर्व धर्मांतील सारभूत अंश घेऊन नव्या धर्माची उभारणी करावी, असेही त्यांना वाटते. अकबराच्या काळात त्याने कुराण, हिंदूंचे काही धर्मग्रंथ व बायबल यांतून तत्त्वे घेऊन मदिन-ए-इलाहीफ (दैवी धर्म) या आपल्या नव्या धर्माची स्थापना केली, परंतू अकबराचा हा प्रयत्न निष्फळ ठरला. अकबरांनी प्रज्वलीत केलेली सांप्रदायिक सदभावाची ज्योत आजही कित्येक जणांना तेजाळत राहिलेली आहे. प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड हे असेच एक व्यक्तिमत्व त्यांचे जीवनच सांप्रदायिक सदभावनेच्या विचाराने सतत उजळून निघत आहे.
डॉ. कराड ः युनेस्को अध्यासनाचे मानकरी
विश्वशांती केंद (आळंदी), माईर्स एमआयटी, पुणे आणि याची स्थापनाच एम.आय.टी. पुणे या संस्थेत झाली. जगात शांतीचे संवर्धन करण्याचे अध्यासन युनेस्कोच्या माध्यमातून या केंद्राला मिळाले. प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड या अध्यासनाचे प्रमुख. आळंदी-देहू या तीर्थक्षेत्री घाट उभारणीचे काम सुरू करून त्यांनी आपल्या कार्याची सुरूवात केली. त्याचबरोबर विश्वशांती केंद्रात सर्व धर्मांचा तुलनात्मक (उेारिीरींर्ळींश ठशश्रळसळेप र्डीींवळशी) अभ्यास सुरू केला. आपल्या धर्माभिमानाच्या भिंतीची उंची काही प्रमाणात कमी करून पलीकडे पाहिले. तर तिकडे आपल्या धर्मासारखीच मूलतत्त्वे असणारा दुसरा सुंदर धर्म आहे, हे त्यांच्या लक्षात आले. माणसाने आपल्या जीवनातील धार्मिक, अध्यात्मिक प्रवृत्तीचा उपयोग सांप्रदायिक सदभाव व त्याद्वारे राष्ट्रात शांती कायम नांदण्याच्या दृष्टीने केला पाहिजे, हे त्यांना उमगले. मग वरवर हंदुत्ववादी दिसणार्या प्रा. डॉ. विश्वनाथ दा. कराड यांना सांप्रदायिक सदभावनेच्या विचाराने पूर्ण पछाडून टाकले. प्रत्येक धर्म, पंथ, जात आणि त्या सर्व माणसांत त्यांना प्रेमाचा सुगंध सापडला. त्यातूनच रामेश्वर (रूई), जि. लातूर येथे साकारले विश्वधर्मी मानवतातीर्थ भवन
विश्वशांती केंद्रः सांप्रदायिक सदभावनेचे मंदिर
रामेश्वर (रूई), ता. जि. लातूर हे भारतातील इतर खेडयांप्रमाणे लहानसे एक खेडे. १५०० लोकवस्तीचे गाव. गावातील शेती मांजरा धरणाच्या ओलिताखाली असल्यामुळे एक सुखी, संपन्न गाव. याच गावात दादाराव कराड यांचे वारकरी कुटुंब. याच कुटुंबात प्रा. डॉ. विश्वनाथ कराड लहानाचे मोठे झाले. आपल्या कुशाग्र बुद्विमत्तेच्या जोरावर एम.ई. मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त करून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथे एक विद्यार्थिप्रिय व उत्तम प्राध्यापक म्हणून नावलौकिक मिळविला. कै. वसंतदादा पाटील यांच्या विचाराने प्रेरित होऊन १९८३ साली त्यांनी माईर्स एम.आय.टी.या अभियांत्रिकी महाविद्यालयाची स्थापन केली. पुढे संस्था वाढविली. त्यासाठी खस्ता खाल्ल्या. संस्था नावारूपाला आली व विश्वशांती केंद्र (आळंदी), पुणे या नावाने एक-गोंडस पुष्प या संस्थेवर बहरले. केंद्राच्या वतीने अनेक धर्मपरिषदांचे आयोजन केले व त्यातून सांप्रदायिक सदभावनेच्या विचार अधिक बळकट झाला. डॉ. कराड सरांनी हा विचार आपल्या जन्मगावी प्रत्यक्षात रूजवून तेथे आज विश्वधर्मी मानवतातीर्थाची उभारणी केली आहे.
हिंदू-मुस्लीम द्वेषातून प्रार्थनास्थळे उदध्वस्त
रामेश्वर (रूई ) या गावी हिंदू, मुस्लीम, बौद्व जाती-जमातीचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात. असे म्हणतात, २७५ वर्षांपूर्वी या गावातील श्रीराम मंदिर पेशवाई व निजामाच्या लढाईत उदध्वस्त झाले. त्या मंदिराच्या काही भग्न शिळा अजूनही त्या गावात आहेत. त्याचा राग म्हणून १९४८ साली निजाम रझाकार खालसा झाल्यानंतर त्या काळात आसपासच्या गावांतील हिंदू लोकांनी रामेश्वर (रूई ) ची जामा मस्जीद व ह. जैनुद्दीन बाबांचा दर्गाही उदध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. या वेळी या गावातील एक प्रगतिशील शेतकरी राष्ट्रधर्मपूजक कै. श्री. दादाराव कराड यांनी फार महत्वाची भूमिका बजावली. धर्म व जातीच्या द्वेषापायी गावातील प्रार्थनास्थळे भग्न होत असताना श्री. दादाराव कराड यांनी मात्र आपल्या ह्दयातील मानवतेची ज्योत सतत तेवत ठेवली. हिंदू-मुस्लिमांमध्ये भेद न करता गावात सांप्रदायिक सदभावाचे वातावरण जोपासले. लहानग्या विश्वनाथाला त्याचे संस्कार दिले.
साकारले मानवतातीर्थ
आपले पूज्य वडील श्री. दादाराव कराड यांच्या निधनानंतर प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांनी सर्व जातिधर्मातील लोकांना बरोबर घेऊन पुन्हा त्याच आपल्या जन्मगावी रामेश्वर (रूई ) येथे एका सुंदर श्रीराम मंदिराची, जामा मशिदीची आणि दर्ग्याची नव्याने उभारणी केली. या मंदिर व मशिदीच्या स्थापनेमध्ये हिंदू-मुस्लीमांनी सहभाग घेतला व आपले आर्थिक योगदान दिले. गावातील हिंदू लोकांनी हजरत जैनुद्दीन चिश्ती यांचा दर्गा बांधून दिला; तर मुस्लिमांनी श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी देणग्या दिल्या. श्रीराम मंदिरातील मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आणि दर्गा व मशिदीचा लोकार्पण सोहळा एकाच दिवशी झाला. त्या दिवशी गावातील सर्व हिंदू-मुस्लिमांनी आपल्या घरांवर गुढ्या उभारून व घरांपुढे रांगोळया काढून आनंद साजरा केला. प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांनी आपल्या कार्यातून सिद्व केले की, धर्म आणि जातीच्या नावे निर्माण होणारी प्रार्थनामंदिरे तेव्हाच मानवतातीर्थ होतील, जेव्हा सर्व जातिधर्माचे लोक एकमेकांच्या धर्माचा आदर करून ती प्रेमाने बांधतील. रामेश्वर (रूई) गावी आल्यानंतर, या खेडयातील ही प्रार्थनास्थळे पाहिल्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या त्या प्रसिद्व भजनाच्या ओळी मी गुणगुणायला लागतो.
या भारतात बंधुभाव नित्य वसू दे
दे वरचि असा दे
हे सर्वधर्म संप्रदाय एक दिसू दे, मतभेद नसू दे
नांदोत सुखे गरीब-अमीर एक मतांनी,
मग हिंदू असो ख्रिश्चन वा हो इस्लामी
स्वातंत्र्य सुखा या सकलामाजी वसू दे,
दे वरचि असा दे १
बुद्व जयंतीची मिरवणूक म्हणजे विश्वव्यापी भारतीय संस्कृतीचे दर्शनच
रामेश्वर (रूई), ता. जि. लातूर या आपल्या गावी हिंदू-मस्लिम ऐक्याची मंदिर-मशीद-दर्गा आणि श्रीराम-रहीम मानवता सेतू ही आध्यात्मिक स्थळे साकारल्यानंतर प्रा. डॉ. कराड यांचे लक्ष त्यांच्या गावातील मागासवर्गीय बंधूकडे गेले नाही, तर मग नवलच म्हणावे लागले असते. खरे म्हणजे यापूर्वीच गावात डॉ. कराड सरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाची उभारणी केली होती. कै. अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने स्मारक करावे, असे त्यांच्या मनात होते; परंतु ज्या तथागत गौतम बुद्वांची ओळखच जगामध्ये मशांतिदूतफ म्हणून आहे किंवा भारत या महान देशाला जगामध्ये आज केवळ गौतम बुद्व आणि महात्मा गांधींचा देश म्हणून संबोधण्यात येते, त्या तथागत गौतम बुद्वांचे व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभे करावे, असा विचार प्रा. डॉ. कराड सरांच्या मनात आला आणि सर कामाला लागले.
रामेश्वर (रूई), ता. जि. लातूर येथील मबुद्व विहार
या भव्य बुद्व विहाराचा लोकार्पण सोहळा मबुद्व पौर्णिमा म्हणजेच बुधवार, दि. १० मे २०१७ रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.रामेश्वर (रूई) येथील मागासवर्गीय बंधूंना प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांनी एकत्र आणून गावात निर्माण केले आहे – एक सुंदर बुद्व विहार तथागत भगवान गौतम बुद्व आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य प्रतिमा (मूर्ती) असलेला जपानचा पॅगोडाच्या धर्तीवर उभारण्यात आलेला हा बुद्व विहार म्हणजे एक उत्तम शिल्पकलेचा नमुनाच म्हणावा लागेल. हा बुद्व विहार या गावात सर्वधर्मसमभावाची साक्ष देतो. तथागतफ भगवान गौतम बुद्व विहार व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती विश्वशांती भवन मध्ये बौद्व धर्माचा इतिहास व पंचशील तत्वे अत्यंत सुबक व देखण्या पद्वतीने उत्तम तैलचित्राच्या माध्यमातून लावण्यात आलेली आहेत. बुद्व विहाराच्या बरोबर पाठीमागील बाजूस विहाराच्या केंद्रस्थानी असलेला सुंदर-तेजस्वी बोधीवृक्ष व त्याला प्रदक्षिणा घालण्यासाठी उभारलेला गोलाकार सेतू आणि विहारासमोर लावलेल्या वेगवेगळया ध्वनी – नाद करण्यार्या मोठया घंटा या बुद्व विहाराचे वैशिष्टय आहे. अशा पद्वतीचे भव्य पॅगोडा शिल्पकलेत बांधलेले बुद्व विहार कदाचित महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात ही अत्यंत नावीन्यपूर्ण ठरले आहे. ही सर्च प्रार्थनास्थळे सर्व भारतीयानांच प्रेरणादायी आहेत. सर्वच धर्मातील लोकांचा व त्यांच्या प्रार्थनास्थळांचा येथील गावकर्यांना अत्यंत अभिमान वाटतो.
बुद्व जयंतीचा ऐतिहासिक सोहळा
दि. ३० एप्रिल २०१८ रोजी रामेश्वर (रूई) , ता. जि. लातूर येथील बुद्व जयंतीची मिरवणूक ऐतिहासिक होती. या ऐतिहासिक प्रसंगाचे दिव्य दर्शन सर्व मान्यवरांना व जनतेला घडले. प्रमुख पाह?णे होते लॉर्ड बुद्वा, नागपूर दूरदर्शन वाहिनीचे प्रमुख श्री. भैय्याजी खैरकर, प्रख्यात साहित्यिक डॉ. रतनलाल सोनग्रा, प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, भदन्त डॉ. महाथेरो, या मान्यवरांच्या उपस्थितीत हा बुद्व जयंतीचा कार्यक्रम पार पडला. मलाही या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे भाग्य लाभले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मी केले.
सोमवार, दि. ३० एप्रिल २०१८ रोजी सकाळी १०.०० वाजता श्रीराम मंदिरात दर्शन घेऊन टाळ-मृदंगाच्या गजरात रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम असे भजन म्हणत बुद्व जंयंतीची मिरवणूक गावातून निघाली. ज्यावेळी ही मिरवणूक तथागत गौतम बुद्व विहार येथे आली, तेव्हा अर्थातच बुद्वम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामि असा जयघोष झाला. मिरवणूक पुढे गावातील जामा मशिदीसमोरून संत गोपाळबुवा मंदिराकडे जात होती. मशिदीजवळ येताच ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम – सबको सन्मती दे भगवान‘ हे महात्मा गांधीजींचे अत्यंत आवडते भजन सर्व जण गात होते. शाळेचे विद्यार्थी अक्षरशः नाचत होते. संत गोपाळबुवा मंदिरात ही मिरवणूक पोहोचताच पुंडलिका वरदे हरी, विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकारामाचा गजर झाला.
सोनावळा नुदीवरील श्रीराम-रहीम मानवता सेतूमधून ही मिरवणूक जात असताना जणू एकीकडे इस्लाम धर्माची आजान (बांग) चे सुमधुर स्वर कानी पडत आहेत, तर त्याच वेळी ह. जैनुद्दीन चिस्ती, यांच्या दर्ग्यावरील कव्वालीचे स्वर साद घालत आहेत, असा भास होत होता. नंतर ह. जैनुद्दीन चिस्ती यांच्या दर्ग्यावर फुलांची चादर अर्पण करून विश्वशांतीसाठी समाधीवर दुऑ मागण्यात आली. या कार्यक्रमात सर्वधर्मीय मान्यवर सामील झाले होते.

रामेश्वर (रूई) , येथील विश्व मानवतातीर्थ
रामेश्वर (रूई ) या गावात खर्या अर्थाने इतिहास घडला आहे. जिथेे एखादी धार्मिक मिरवणूक काढत असताना पोलिसांची मदत घ्यावी लागते, तिथे या गावातील मिरवणुकीमध्ये विविध जातिधर्मांचे लोक, विद्यार्थी, युवक-युवती सर्वधर्मीयांची भजणे म्हणत आनंदात सहभागी होताहेत, हे नवलच म्हणावे लागेल. म्हणून रामेश्वर (रूई) केवळ मानवतातीर्थ नसून, त्याला विश्वधर्मी मानवतातीर्थ असेच म्हणावे लागेल.
दि. ०६ मे, २०२५ रोजी जागतिक किर्तीचे महान संगणकतज्ञ डॉ. विजय भटकर यांनी रामेश्वर (रूई) या गावचे नामकरण विश्वधर्मी मानवता तिर्थ असे केले. विशेष म्हणजे रामेश्वर (रूई) या गावच्या सर्व नागरिकांनी, ग्रामसभेने व ग्रामपंचायतीने एकमुखाने तसा ठराव पारित केला होता. आज संत गोपाळबुवांच्या प्रांगणात २८८ फुट लांव आणि १२६ फुट रूंद असलेले विश्वधर्मी मानवता भवन उभे राहिले आहे. जगातील सर्व प्रसिध्द शास्त्रज्ञ व संत यांची ४४ भव्य तैलचित्रे येथे प्रत्येक खांबावर लावण्यात आली आहे. हे मानवता भवन म्हणजे बांधकामाचा वेगळाच आदर्श नमुना आहे. प्रा. डॉ. विश्वनाथ कराड सर या मानवता भवनाद्वारे सार्या जगाला महात्मा गांधींच्या स्वप्नातील खेडेगावाद्वारे विश्वशांतीचा, बंधुभावाचा आणि प्रेमाचा संदेश देत आहेत ते पाहून माझे तर हात जुळतात आणि तोंडातून शब्द फुटतात, धन्य ते विश्वधर्मी मानवता भवन रामेश्वर (रूई) गांव आणि धन्य ते प्रा. डॉ. विश्वनाथ कराड त्यांना माझा साष्टांग नमस्कार, दंडवत.
मूळ लेखन : डॉ. एस. एन. पठाण
(माजी कुलगुरू)



