माऊलींचे संजीवन समाधी दिन सोहळ्यास अलंकापुरीत प्रारंभ
श्रीगुरु हैबतबाबा पायरी पूजनाने धार्मिक प्रथा परंपरा कायम

आळंदी कार्तिकी यात्रा २०२५ वर थंडीसह आचारसंहितेचे सावट
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात आळंदी कार्तिकी यात्रा अंतर्गत तसेच श्रींचे ७५१ व्या जन्मोत्सवी वर्षातील ७३० व्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी दिन सोहळ्यास श्री गुरु हैबतबाबा यांचे पायरी पूजनाने हरिनाम गजरात वारकरी संप्रदायातील प्रथापरंपरांचे पालन करीत वीणा, टाळ, मृदंगाचा त्रिनादात श्रीक्षेत्रोपाध्ये वेदमूर्ती ब्रह्मवृंदाच्या वेदमंत्र जयघोषात आळंदी कार्तिकी यात्रेस प्रारंभ झाला. यावेळी श्रींचे पायरी पूजन प्रसंगी श्रींचे पुजारी अमोल गांधी, पुजारी काका कुलकर्णी यांनी वेदमंत्र जयघोष करीत पौरोहित्य केले.
या प्रसंगी श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मालक राजेंद्र आरफळकर, ऋषीकेश आरफळकर, आळंदी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब, डॉ.भावार्थ देखणे, विधीतज्ज्ञ राजेंद्र उमाप, निलेश महाराज लोंढे, पुरुषोत्तम महाराज पाटील, श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष विधीतज्ञ विष्णू तापकीर, आवेकर भावे रामचंद्र संस्थान आळंदी विश्वस्त अर्जुन मेदनकर, नगरपरिषद मुख्याधिकारी माधव केंद्रे, आळंदी पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक भिमा नरके, पोलीस नाईक मच्छिन्द्र शेंडे, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, तुकाराम माने, सेवक चोपदार बाळासाहेब रणदिवे, श्रींचे मानकरी बाळासाहेब उर्फ योगीराज कुऱ्हाडे, स्वप्नील कुऱ्हाडे, मंगेश आरु, माजी नगरसेवक डी. डी. भोसले पाटील, आळंदी शहर शिवसेनेचे शहराध्यक्ष राहुल चव्हाण, काँग्रेसचे संदीप नाईकरे, ज्ञानेश्वर गुळूंजकर, विठ्ठल घुंडरे, भिमाजी घुंडरे पाटील, शिवसेना उपशहर प्रमुख ज्ञानेश्वर घुंडरे पाटील, माजी व्यवस्थापक श्रीधर सरनाईक, भाजपचे नेते संकेत वाघमारे यांचेसह आळंदीकर ग्रामस्थ, वारकरी भाविक, दिंडीकरी उपिस्थत होते.

श्रींचे सोहळ्याचा प्रारंभ दिनी महाद्वारात वैभवी श्री गुरू हैबतबाबा यांचे पायरी पूजन परंपरेने वेदमंत्र जयघोषित श्रींचे पुजारी अमोल गांधी आणि सहकारी यांचे वेदमंत्र पठणात झाले. यावेळी विश्वस्त योगी निरंजन नाथसाहेब यांनी पौरोहित्यात सहभागी होत वेदमंत्र पठण केले. दरम्यान पायरी पूजन प्रसंगी मंदिरात महाद्वारातून प्रवेश बंद ठेवण्यात आला होता.
श्रींचे पायरी पूजनात दूध, दही, मध, साखर, तूप, अत्तर, पुष्पहार, नववस्त्र अर्पण करीत प्रसाद वाढवत विधिवत पायरी पूजन श्रींची आरती, पसायदान झाले. तत्पूर्वी अभंग, भजन हरिनाम गजरात झाले. श्री गुरू हैबतबाबा पायरीचे परंपरेने पूजन झाल्यावर मालकांचे वतीने मानकरी, मान्यवर यांना नारळ प्रसाद देऊन सन्मानित करण्यात आले. श्री गुरू हैबतबाबा यांचे ओवरीत आरती, अभंग, दर्शन त्या नंतर दिंडीची मंदिर प्रदक्षिणा हरिनाम गजरात झाली. भाविक, वारकरी दिंडीकरी यांना मालकांचे वतीने महाप्रसाद झाला. श्रींचे पायरी पूजन प्रसंगी वेदमंत्र जयघोष करण्यासाठी श्रींचे पुजारी अमोल गांधी आदी सहकारी यांनी परिश्रम पूर्वक पौराहित्य केले.

परंपरेने माउली मंदिरात श्रीनां दुपारी महानैवेद्य झाला. मंदिरात सोहळ्यातील परंपरेने वीणा मंडपात योगिराज ठाकूर, बाबासाहेब आजरेकर यांचे तर्फे कीर्तन सेवा, रात्री हैबतबाबा यांच्या पायरीपुढे वासकर महाराज, मारुतीबुवा कराडकर, आरफळकर महाराज यांच्या तर्फे हरीजागर सेवा होत आहे. कार्तिकी वारी कालावधीत भाविकांना खिचडी, प्रसाद, चहा वाटप तसेच आर्ट ऑफ लिविंग तर्फे पिण्याचे पाणी वाटप सेवा आणि एकादशी दिनी केळी वाटप सेवा होत आहे. आळंदी स्वकाम सेवा मंडळाचे वतीने स्वच्छता सेवेसह इतर मदत कार्य नेहमी प्रमाणे केले जाणार असल्याचे अध्यक्ष सुनील तापकीर यांनी सांगितले.
आळंदी कार्तिकी यात्रेस पंढरपूर येथून श्री पांडुरंगरायांची पालखी रथ सोहळा तसेच श्री संत नामदेवरायांचा पालखी सोहळा हरिनाम गजरात प्रवेशला. आळंदी मार्गावरील श्री संत ज्ञानेश्वर महाराज थोरल्या पादुका देवस्थान तर्फे अध्यक्ष विधितज्ज्ञ विष्णू तापकीर, श्री संत ज्ञानेश्वर महाराज धाकट्या पादुका देवस्थान येथे श्री ज्ञानेश्वर महाराज चरित्र समिती अध्यक्ष प्रकाश काळे यांनी स्वागत करून पूजा केली. यावेळी श्रींचे दर्शनास भाविकांची गर्दी केली होती. आळंदीत राज्य परिसरातून हजारो भाविक आळंदीत दाखल झाले असून मनाचे पालखी सोहळे आळंदीत हरिनाम गजरात दाखल झाले आहेत.



