पुणे : जागतिक स्तरावर दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी कार्यरत, संयुक्त राष्ट्रसंघाची सदस्य असलेल्या ‘व्हॉइस ऑफ स्पेशली एबल्ड पीपल’ या संस्थेतर्फे पुण्यातील वानवडी येथील दिव्यांग कल्याणकारी शिक्षण संस्थेतील ७५ दृष्टिहीन व्यक्तींना एआय स्मार्ट ग्लास भेट देण्यात आले. उच्च दर्जाच्या या अत्याधुनिक उपकरणांच्या साहाय्याने दृष्टिहीन विद्यार्थी आता अधिक सुलभ आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण घेऊ शकतील. दिव्यांगांच्या जीवनात तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांचे जीवन अधिक सुलभ, स्वतंत्र आणि सशक्त बनवण्याचे कार्य ‘व्हॉइस ऑफ स्पेशली एबल्ड पीपल’ ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून करत आहे.
याप्रसंगी संस्थेचे संस्थापक प्रणव देसाई यांनी अमेरिकेतून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थितांना संबोधित केले. भारताचे पहिले पॅरा ऑलिंपिक सुवर्णपदक विजेते मुरलीकांत पेटकर यांनी ऑनलाईन उपस्थित राहून संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. लंडनहून खास या कार्यक्रमासाठी आलेल्या देणगीदार अरुणिमा यांनी समाधान व्यक्त केले. जनसेवा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र हीरेमठ, संस्थेचे सल्लागार डॉ. उत्तम ओझा, दिव्यांग कल्याणकारी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ऍड. मुरलीधर कचरे, अधिवक्ता गिरीश शेवते, मुख्याध्यापिका शिवानी सुतार, आरती टेकवडे आदी मान्यवर उपस्थित होते. तांत्रिक सहाय्यक मोहम्मद फैज आणि ध्रुव चावला यांनी दृष्टिहीनांना स्मार्ट ग्लास वापरण्याचे प्रशिक्षण दिले.
प्रणव देसाई म्हणाले, “हे उपकरण दिव्यांगांच्या जीवनात परिवर्तन घडवेल. याच्या सहाय्याने ते सामान्य व्यक्तीप्रमाणे अनेक गोष्टी करू शकतील. आमचे उद्दिष्ट फक्त उपकरणे देण्याचे नाही, तर त्यांच्या आयुष्यात आत्मनिर्भरतेचा आणि सशक्ततेचा परिवर्तन घडवून देशाच्या आर्थिक प्रगतीत त्यांचा वाटा सुनिश्चित करण्याचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेची पूर्तता करण्यासाठी आम्ही भारतातील प्रत्येक दिव्यांगाला सहाय्यक उपकरणे उपलब्ध करून देणार आहोत. यामुळे दिव्यांग देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान देतील. आतापर्यंत संस्थेने देशभरातील ५२ हजारांहून अधिक दिव्यांगाना सहाय्य करून सक्षम केले आहे.”
डॉ. राजेंद्र हीरेमठ यांनी प्रेरणादायी विचार मांडत सांगितले की, दृष्टी नसली तरी दृष्टिकोन सकारात्मक असावा. नोकरी मागणारे नव्हे, तर नोकरी देणारे व्हावे. स्वावलंबन हेच खरे सशक्तीकरण आहे. त्यांनी जनसेवा बँकेच्या विविध योजनांची माहिती देत, भविष्यात दिव्यांगांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ‘व्हॉइस ऑफ स्पेशली एबल्ड पीपल’सोबत संयुक्तरीत्या काम करण्याची तयारी दर्शवली.
अरुणिमा यांनी या उपक्रमाचे कौतूक करतानाच दिव्यांगांच्या जीवनात बदल घडत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. डॉ. उत्तम ओझा यांनी सूत्रसंचालन केले. ऍड. मुरलीधर कचरे यांनी आभार मानले.
Post Views: 10