गीतांमधून उलगडले ‘बहुआयामी पाडगावकर’

पुणे : आपल्या सहजसुंदर सोप्या परंतु आशयघन शब्दांमधून प्रेम, निसर्ग, मानवी भावनांचे तरल चित्रण साकारणाऱ्या कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त ‘बहुआयामी पाडगावकर’ या कार्यक्रमातून भावगीते, प्रेमगीते, निसर्गगीते आदींचे सर्वांगिण दर्शन पुणेकर रसिकांना घडले.
निमित्त होते पूना गेस्ट हाऊस स्नेह मंच आयोजित विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे. ‘शुक्रतारा मंद वारा’, ‘तुझे गीत गाण्यासाठी’, ‘श्रावणात घननिळा बरसला’, ‘भावनांचा तु भुकेला’, ‘दिवस तुझे फुलायचे’, ‘शब्द शब्द जपून घेई’, ‘डोळे कशासाठी’, ‘अशी पाखरे येती’, ‘मी चंचल होऊन आले’, ‘असा बेभान हा वारा’, ‘भेट तुझी माझी स्मरते’ अशा सुप्रसिद्ध गीतांचे सुमधुर सादरीकरण मनिषा निश्चल, मंदार आपटे आणि अर्चना गोरे यांनी केले. कार्यक्रमाची संकल्पना गायक व संगीतकार मंदार आपटे यांची होती. महेक प्रस्तुत हा कार्यक्रम पूना गेस्ट हाऊस येथे आयोजित करण्यात आल होता.
मंगेश पाडगावकर यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या गीतांविषयी माहिती, तसेच त्यांच्या आठवणींना उजाळा देत श्रेयसी वझे यांनी कार्यक्रमाचे रंगतदार निवेदन केले. कलाकारांना अमेय ठाकूरदेसाई (तबला), झंकार कानडे (की-बोर्ड) यांनी समर्पक साथसंगत केली.
संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे, ज्येष्ठ चित्रपट समीक्षक सुलभा तेरणीकर, पिंपरी-चिंचवड साहित्य परिषदेचे अध्यक्ष राजन लाखे, शिवसृष्टीचे सल्लागार राजीव जालनापूरकर, ज्येष्ठ लेखिका मृणलिनी चितळे, नेहा नगरकर, डॉ. प्रसाद पिंपळखरे, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त लेखिका डॉ. संगीता बर्वे, ज्येष्ठ पत्रकार राजीव साबडे, केळकर म्युझिअमचे सुधन्वा रानडे, सरहद संस्थेचे लेशपाल जवळगे, गायक राजेश दातार आदी मान्यवरांची उपस्थिती होती. प्रास्ताविक डॉ. किशोर सरपोतदार यांनी केले. परिचय दीपा देशपांडे यांनी करून दिला.
फोटो ओळ : ‘बहुआयामी पाडगावकर’ कार्यक्रमात गीते सादर करताना मनिषा निश्चल, मंदार आपटे, अर्चना गोरे.


