मराठी
कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान विवेकाधिष्ठित वापराने आत्मसात करा अच्युत गोडबोले यांचे प्रतिपादन
ऑल इंडिया बॅक ऑफ महाराष्ट्र एम्प्लाॅईज फेडरेशनच्या अधिवेशनात मार्गदर्शन

‘एआयबीओएमईएफ’च्या चेअरमनपदी देविदास तुळजापूरकर, महासचिवपदी कॉ. धनंजय कुलकर्णी
पुणे: “कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) तंत्रज्ञान जीवनाच्या अनेक क्षेत्रांत लवकरच जागा व्यापणार आहे. ते नाकारणे शक्य होणार नाही. त्यामुळे एआयचे तंत्रज्ञान विवेकाधिष्ठित वापराने आत्मसात करणे आवश्यक आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ आणि लेखक अच्युत गोडबोले यांनी केले. गोडबोले यांनी ‘एआय’च्या युगाचा सुरवातीपासून आढावा घेत, संगणकीय तंत्रज्ञानाचे टप्पे स्पष्ट केले.
‘एआयबीईए’शी संलग्नित ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशनच्या (एआयबीओएमईएफ) दोन दिवसीय नवव्या अखिल भारतीय अधिवेशनात ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कामगार वर्ग – संधी, आव्हाने आणि पुढील वाटचाल’ या विषयावरील व्याख्यानात गोडबोले बोलत होते. बीएमसीसी रस्त्यावरील दादासाहेब दरोडे सभागृहात आयोजित कार्यक्रमात ‘एआयबीओएमईएफ’चे महासचिव देवीदास तुळजापूरकर, अध्यक्ष स्वयंप्रकाश तिवारी, सचिव धनंजय कुलकर्णी, संयोजक शैलेश टिळेकर आदी उपस्थित होते.
अच्युत गोडबोले म्हणाले, “कृत्रिम बुद्धीमत्तेचे युग आपण रोखू शकत नाही आणि नाकारू शकत नाही, ही वस्तुस्थिती असेल, तर या युगाचा विवेकाने स्वीकार, हाच चांगला मार्ग ठरेल. ‘एआय’ युगाचा सर्वाधिक प्रभाव सेवा आणि आरोग्य क्षेत्रावर पडेल. अनेक प्रचलीत रोगांवर नियंत्रण मिळवणे सुलभ होईल. आर्टिफिशियल न्यूराॅन नेटवर्कने मशीनला डाटा पुरवून पॅटर्न ओळखण्याची क्षमता अधिकाधिक प्रगत करत नेणे, या प्रक्रियेत हे तंत्रज्ञान सध्या आहे. सर्व उद्योग, व्यवसाय, सेवा आणि सर्जनशीलतेची क्षेत्रेही कृत्रिम बुद्धिमत्तेने व्यापली जातील, असे चित्र आहे. ‘एआय’मुळे अनेक चांगल्या आणि सकारात्मक गोष्टी घडतील, ही वस्तुस्थिती असली, तरी हे तंत्रज्ञान अयोग्य आणि अनैतिक मार्गांनी वापरले गेल्यास त्याचे दुष्परिणामही संभवतात. त्यामुळे ‘एआय’चा वापर नेहमीच विवेकाने आणि जबाबदारी केला गेला पाहिजे.”
धनंजय कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. स्वयंप्रकाश तिवारी यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. देविदास तुळजापूरकर यांनी आभार मानले.
———————–


