माती गणपती मंडळातर्फे ‘गोंद्या आला रे आला’ सजिव देखावा
नारायण पेठ माती गणपती मंडळ ट्रस्ट : डॉ. रोहित टिळक यांच्या हस्ते देखाव्याचे उद्धाटन

पुणे: ‘गोंद्या आला रे आला’ हे सांकेतिक शब्द वापरुन दिनांक २२ जून १८९७ रोजी पुण्याच्या मातीने एक अभूतपूर्व क्रांतिकारी घटना अनुभवली. क्रांतिवीर चाफेकर बंधूंनी प्लेग आयुक्त रॅंडचा वध करून ब्रिटिश साम्राज्याच्या दडपशाहीला थेट आव्हान दिले. आपल्या कृत्याचा शेवट फाशीमध्ये होईल, याची पूर्ण जाणीव असूनही त्यांनी स्वातंत्र्याच्या कार्यासाठी पुढे पाऊल टाकले. एवढेच नव्हे, तर यातील दोन भावंडांना बायका-मुलं असतानाही त्यांनी मातृभूमीच्या प्रेमासाठी आपल्या संसाराला व प्राणाला तिलांजली दिली. स्वातंत्र्यलढ्याला दिशा देणारी ही घटना पुन्हा जिवंत करण्याचे काम माती गणपतीच्या यंदाच्या देखाव्यात करण्यात आले आहे.
नारायण पेठ माती गणपती मंडळ ट्रस्टच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सवात ‘गोंद्या आला रे आला’ हा सजीव देखावा सादर करण्यात येत आहे. देखाव्याचे उद्घाटन लोकमान्य टिळक यांचे खापर पणतू डॉ. रोहित टिळक यांच्या हस्ते झाले. प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या डॉ. निवेदिता एकबोटे, परेश हराळे, विशाल नांगरे, महेश हराळे, शुभम आदवडे, निखिल देशपांडे व मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. मारवा क्रिएशन यांनी देखाव्याची निर्मिती केली असून लेखन दिग्दर्शन राहुल गाजरे प्रज्ञा दंडवते यांचे आहे.
रोहित टिळक म्हणाले, माती गणपती मंडळ नेहमीच अतिशय चांगले उपक्रम राबवत असते. वर्षभर आयोजित शिबिरे आणि कोविड काळात केलेले कार्य हाच लोकमान्य टिळकांना अपेक्षित गणेशोत्सव आहे. अशा उपक्रमांतून सामाजिक बांधिलकी निर्माण होते. ‘गोंद्या आला रे आला’ या देखाव्यातून इतिहासाची ओळख तर होतेच, पण समाजात सामाजिक जाणीवही दृढ होते. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण बलिदान विसरतो, तसे होऊ नये.
कौस्तुभ खाकुर्डीकर म्हणाले, माती गणपती मंडळाचा उद्देश केवळ धार्मिक सण साजरा करण्यापुरता मर्यादित नसून सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक जाणीवा जनमानसात रुजवणे हाही आहे. या देखाव्याद्वारे आम्ही चाफेकर बंधूंचे शौर्य, त्याग आणि देशभक्ती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत. ‘गणेशोत्सव हा लोकशिक्षणाचा उत्सव असावा’, ही लोकमान्य टिळकांची कल्पना होती, त्याच धर्तीवर आमचे उपक्रम राबवले जातात. या देखाव्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे, असेही त्यांनी सांगितले.