दुसऱ्यांना मदत करणे हा भारतीय संस्कृतीचा स्वभाव धर्म -खासदार डॉ. मेधा कुलकर्णी
'गुडविल' पुस्तकाचा प्रकाशन समारंभ : मोरे वेल्फेअर ट्रस्टच्या गुडविल इंडिया उपक्रमातर्फे आयोजन

पुणे : गुडविल संस्थेने लोकांकडून कपडे गोळा करून ते गरजू लोकांपर्यंत पोहोचवले. चांगले कपडे घालण्याची हौस प्रत्येकाला असते. गुडविल संस्थेमुळे रस्त्यावरच्या तसेच गरजू लोकांनाही चांगले कपडे घालायला मिळतात. अशा लोकांसाठी देवदूता सारखी ही संस्था पुढे आली आहे. दुसऱ्यांना मदत करण्याचा भारतीय संस्कृतीचा स्वभाव धर्म आहे आणि आपल्या संस्कृतीचे ते वैशिष्ट्य देखील आहे. थकलेल्या कष्टकरी श्रमजीवी लोकांना आधार देण्याचे काम गुडविल संस्था करत आहे, असे प्रतिपादन खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी केले.
मोरे वेल्फेअर ट्रस्टच्या गुडविल इंडिया उपक्रमाच्या वतीने ‘गुडविल- लोकांनी लोकांसाठी चालवलेला सामाजिक उपक्रम’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून राज्यसभेच्या खासदार संसदरत्न डॉ. मेधा कुलकर्णी, माजी खासदार अशोक मोहोळ, एअरमार्शल भूषण गोखले (निवृत्त) , ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे, गुडविल इंडियाचे अध्यक्ष कालिदास मोरे, यांसह युनिव्हर्सल समूहाचे रोहिदास मोरे, उत्कर्ष प्रकाशनचे सुधाकर जोशी, लेखक प्रसाद घारे उपस्थित होते.
डॉ.मेधा कुलकर्णी म्हणाल्या, मुलींना देखील लग्नाच्या वेळी भांडी संस्थेकडून देण्यात येतात. आजच्या काळातही मुलींच्या आत्महत्याच्या घटना आपल्याला पाहायला मिळतात. वर पक्षाकडून काही ना काही अपेक्षा असतेच. परंतु समाज बदलायला वेळ लागतो तो हळूहळू बदलत आहे तो पर्यंत मुलींच्या मागे गुडविल उभे आहे. कालिदास मोरे हे पद्मश्री नसले तरी पुण्यश्री नक्की आहेत अशा शब्दात त्यांनी मोरे यांचे कौतुक केले.
डॉ. सदानंद मोरे म्हणाले, साधुत्वाचा अंश असणारे लोक हल्ली कमी आढळतात. त्यात कालिदास मोरे यांचा समावेश होतो. गरजूंसाठी काम करण्याचा शुभ संकल्प करून त्यांनी तो पुढे नेला आहे. समाजसेवेचे वेगळे मॉडेल त्यांनी दिले आहे. त्याचा प्रसार व्हायला हवा आणि त्यांचा आदर्श घेऊन इतर संस्था चालवल्या पाहिजेत.
पांडुरंग बलकवडे म्हणाले, पुण्याच्या सांस्कृतिक इतिहासात या कार्यक्रमचा उल्लेख केला जाईल आणि आज प्रकाशित झालेले ‘गुडविल- लोकांनी लोकांसाठी चालवलेला सामाजिक उपक्रम’ हे पुस्तक इतिहासाचा ठेवा म्हणून उपयोगी पडेल. कार्य कसे उभे करावे आणि कसे पुढे न्यावे यासाठी पुस्तक मार्गदर्शक ठरेल.
अशोक मोहोळ म्हणाले, देशासाठी काम करणारे लोक देशाचे संरक्षण करणारे आहेत. गरिबांसाठी असे काम करणारी लोक कमी आहेत ते काम गुडविल संस्था करत आहे. माणसाकडे खूप पैसा आला तर तो लोकांपासून दूर जातो. जेव्हा माणूस या जगाचा निरोप घेतो त्यावेळी त्याचे सत्कर्म टिकते.
कालिदास मोरे म्हणाले, मोरे वेल्फेअर ट्रस्टचा गुडविल इंडिया उपक्रम हा लोकांनी लोकांसाठी चालवलेला सामाजिक उपक्रम आहे. सोसायट्यांमधून जुने कपडे संकलित करून ते धुऊन, इस्त्री करून, कमी दरात विक्री केंद्रांमध्ये उपलब्ध करून दिले जातात. गरीब व गरजूंना अल्प किमतीत कपडे मिळावेत हा प्रमुख उद्देश आहे. या माध्यमातून महिलांना रोजगाराची संधी देण्यात आली. एकाच वेळी २ लाख ९३ हजार कपडे गोळा करून वर्ल्ड रेकॉर्ड देखील संस्थेने केला आहे. शेखर मोरे यांनी आभार मानले.