पश्चिम बंगालमधील हिंदूंवरील अत्याचारा विरोधात विहिंपचे जन आक्रोश आंदोलन
विश्व हिंदू परिषद बजरंग दल कसबा जिल्हा यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

पुणे . ‘पश्चिम बंगाल की गलीया सुनी है, ममता सरकार खुनी है’.. ‘हिंदू वरील अत्याचार थांबलाच पाहिजे’.. अशा घोषणा देत पश्चिम बंगाल येथे हिंदूंवर होत असलेल्या होत अत्याचाराचा जाहीर निषेध करण्यासाठी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. पश्चिम बंगाल मध्ये लवकरात लवकर राष्ट्रपती शासन लागू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.त्याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी कार्यालयात महामहिम राष्ट्रपती यांच्या नावाने देण्यात आले.
विश्व हिंदू परिषद बजरंग दल कसबा जिल्हा यांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालय येथे विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येत आंदोलन केले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री किशोर चव्हाण, लालजी महाराज, बजरंग दल संयोजक नितीन महाजन, विभाग मंत्री धनंजय गायकवाड, केतन घोडके, विभाग सहमंत्री संतोष अनगोळकर, जिल्हा मंत्री विजय कांबळे, बजरंग दल संयोजक विक्रम घुंगुरवाले, मातृ शक्ती संयोजिका सरिता अंबिके यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.
किशोर चव्हाण म्हणाले, पश्चिम बंगाल मध्ये होणारे हिंसक आंदोलन थांबवण्यात ममता बॅनर्जी सरकार यांना अपयश आले आहे. त्यांचा मूक पाठिंबा या आंदोलनाला आहे. हिंदू लोकांचा काही संबंध नसताना त्यांना लक्ष्य करण्यात आले, दुकाने जाळली, गाड्या जाळल्या महिलांवर अत्याचार करण्यात आले. हे हिंसक आंदोलन पश्चिम बंगालमधील वेगवेगळ्या भागात पसरले. हिंदू धर्म, हिंदू समाज आणि पोलिस प्रशासनाला लक्ष्य करण्यात आले आहे. त्यामुळे पश्चिम बंगाल येथे राष्ट्रपती शासन लागू करण्याची गरज आहे. हिंदूंवरील अत्याचारांचा निषेध आंदोलनातून आम्ही करत आहोत. देशभरात आज विविध ठिकाणी आंदोलन होत असून पश्चिम महाराष्ट्र प्रांतात विविध भागात सुमारे ५० पेक्षा अधिक ठिकाणी आंदोलने झाली.