आमदार बाबाजी काळे यांच्या प्रयत्नातून खेड तालुक्यास १३ कोटींचा निधी मंजूर

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) :
पुणे जिल्हा नियोजन समितीतून खेड तालुक्यातील विकास कामांसाठी १३.५९ कोटींचा निधी मिळाला आहे, अशी माहिती आमदार बाबाजी काळे यांनी दिली.
कडूस, आंबोली, वाडा, पाईट या चार प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या इमारतींच्या विस्तारीकरणासाठी आणि देखभाल दुरुस्तीसाठी एकूण १० कोटी ६६ लाखांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामध्ये कडूस प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी २ कोटी ९६ लाख, पाईट प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी २ कोटी ९६ लाख, आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी २ कोटी ३६ लाख आणि वाडा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीसाठी २ कोटी ३६ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
खेड तालुक्यात ११ नवीन अंगणवाड्या बांधण्यासाठी प्रत्येकी ११ लाख २५ हजारांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामध्ये निघोजे, निघोजे (कुरणवस्ती), सुरकुंडी (माझगाव), चऱ्होली खुर्द (विश्रांतवड), रासे (मुंगसेमळा), महाळुंगे (महाळुंगे १ व महाळुंगे २), कडूस (ढमालेशिवार), दावडी, कुरकुंडी (राळेवस्ती), कुडे बुद्रुक या गावातील अंगणवाड्यांसाठी एकूण १ कोटी २३ लाख रुपये मंजूर झाले आहेत. कन्हेरसर येथील पाझर तलाव दुरुस्तीसाठी ४५ लाख, भोसे येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी २० लाख, पाळू येथील निंबोडीच्या ओढ्यावर साठवण बंधारा बांधण्यासाठी ५१ लाख, घोटवडी येथील पालचोंडी डोहात साठवण बंधारा बांधण्यासाठी ३० लाख रुपये मंजूर झाले आहेत, अशी माहिती आमदार काळे यांनी दिली.