
वारीचं कुतूहल काही केल्या उलगडतच नाही . त्यातल्या प्रत्येक गोष्टीच कौतुक..अप्रुप वाटत राहतं .
मला तर ह्या वारकऱ्यांच्या पांढऱ्या कपड्यांचं पण वाटतं …. शर्ट,पायजमा ,टोपी पांढरे शुभ्र…
ईतके पांढरे कपडे घालून कसे येतात हे लोक..
त्याविषयी विचारावं असं वाटलं.पालखी दर्शनासाठी गेले तेव्हा त्यांच्याशी संवाद साधला .त्यातल्या काही दादांनी जे सांगितलं ते तुम्ही वाचा.
” आम्ही हे कपडे फक्त वारीलाच घालतो इतर वेळेस नाही . घरी गेलो की भट्टीला देतो आणि आणून बांधून ठेवून देतो पुढच्या वर्षीच काढतो.”
” मला माझी बहीण घेऊन देते. तिच्या घरचं खटलं खूप मोठं आहे. तिला वारीला यायला कधीच जमत नाही. म्हणते…. तुला कपडे तरी घेते रे ..तेवढच मला समाधान..”
एक दादा म्हणाले,
” माझी आई माझ्यासाठी कपडे शिवते. मशीन कामं येतं तिला. किती छान शिवते बघा ना ”
असं म्हणून दादांनी उभं राहून पायजमा शर्ट दाखवला..
त्यांना त्यांच्या आईचे कौतुक आणि अभिमान आहे याचा मला फार आनंद झाला…
” हा बघा सोपाना याचा भाऊ याचं लय लाडकोडं करतोय.. तोच देतो याला नवीन कापडं घेऊन”
एक दादा सांगत होते..
वयानी थोडा लहान असलेला सोपाना खुशीत येऊन हसत होता.
” माझी बायको अंगणवाडीत शिक्षिका आहे. आमच्या गावी चांगली कापडं भेटत नाहीत. बायको तालुक्याला जाऊन माझ्यासाठी घेऊन येते.”
“किती कपडे घेऊन येता?” मी विचारल.
” पावसा पाण्यात भिजतात म्हणून पुरेसे जोडं घेऊन यावे लागतात…”
एक एक जण सांगत होते.
मी ऐकत होते. एकानी तर सांगितले की …
वारकऱ्यांनी वारीत घातलेले हे कपडे दुसरे लोक आनंदाने मागून नेतात .कौतुकाने घालतात ….
हे ऐकून तर माझं डोळे भरून आले. किती निर्मळ श्रद्धा … वारीत पंढरीला जाऊन आलेल्या त्या कपड्याचं पण अप्रूप असाव…
किती भक्तीभाव… आपली संस्कृती किती संवेदनशील आहे याचीच यातून आपल्याला प्रचिती येते.
लोकांना वारकऱ्यांच्या साध्या कपड्यातून सुद्धा विठ्ठलाशी जवळीक साधावीशी वाटते..
वारीला निघालेल्या आया बहिणी शेजारीच बसल्या होत्या. त्यांच्याकडे बघितलं सगळ्या जणींच्या अंगावर साध्या सुध्या साड्या होत्या. त्या आमचं बोलणं ऐकत होत्या. मग त्यांच्याशीही संवाद साधला. एकजण म्हणाली ,
“पुरुषमाणसांची गोष्ट वेगळी असते …. त्यांना पाहिजेतच तशी चांगली कापडं… आमच्या बायकांचं काय हो ….वारीत यायला मिळालं याचाच आम्हाला आनंद होतो बघा …..इथं आमची कापडं कोण बघतंय?”..
शांत संयमीत आवाजात त्या बोलत होत्या. त्यांची कुठलीच तक्रार नव्हती.
” वरून पाऊस पडतोय म्हणून लगेच वाळतील अशा साड्या आम्ही घालतो .आणि त्यानी झपाझपा चालायला येतंय बघा…”
” वारीपुरत्या घालायला आमच्या मैत्रिणी पण आम्हाला साड्या देतात”
एक ताई म्हणाल्या,
” आम्ही दर महिन्याला थोडे थोडे पैसे मागे टाकतो आणि वारीला जायच्या वेळी एखादी नवीन साडी घेतो.”
सगळ्या बायका गप्पा मारत काही काही सांगत होत्या.
” अहो हिचा मुलगा अमेरिकेत आहे. पण तिला कसला गर्व नाही बघा.. ती आमच्यातच बसतीय..”
मी ताईंना म्हटलं,
” अरे वा.. तुमचा मुलगा तिकडे आहे”?
” पांडुरंगांन बुद्धी दिली म्हणून शिकला.. आता बक्कळ पोरं तिकडं जातायत.. त्याचं काय.. तो गेला म्हणून आपण आपला धर्म सोडायचा का काय?”
त्या अगदी सहजपणे म्हणाल्या.
जीवनाच साधं सोपं तत्त्वज्ञान घेऊन या बायका जगत असतात .हा लहान हा मोठा हा भेदभाव त्यांच्यात नसतोच.
ह्या खऱ्याखुऱ्या वारकरणी होत्या. देहभान विसरून आळंदी ते पंढरपुर पायी चालणाऱ्या…
श्रद्धा ,भक्ती आणि विठूरायावरचं अढळ प्रेम त्यांना चालण्याच बळ देतं.
त्यांच्या कपड्यांकडे लक्ष जाण्यापेक्षा त्यांच्या आतल्या निर्मळ अंतःकरणाचे दर्शन मला झालं .
एक बाई उभी राहिली डोक्यावरून पदर घेतला दुसरीनी तिच्या डोक्यावर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती ठेवली.” मी बघत होते न राहून विचारलं…
” ताई कसं चालता हो इतकी जडं मूर्ती डोक्यावर घेऊन ?”
ती पटकन म्हणाली,
” देवाचं कुठं ओझं असतय का?
मनात आलं ….इतका सोज्वळ भक्ती भाव असलेल्यांनाच वारी करायला मिळते…..
वारकऱ्यांच्या अंगावरच्या पांढऱ्या कपड्यांसारखंच अंतरंग पांढरं स्वच्छ शुद्ध आहे.
ही मोठी मोलाची गोष्ट आहे…
वारी काय काय शिकवते ना आपल्याला…….
नीता चंद्रकांत कुलकर्णी