आरोग्य एटीएमच्या माध्यमातून ग्रामीण भागातील आरोग्य सेवा अधिक प्रभावी व कार्यक्षम करण्याचा प्रयत्न
‘क्लिनिक्स ऑन क्लाऊड’ या आरोग्य एटीएमच्या संकल्पनेद्वारे तळागाळात पोहोचतीये आरोग्य सेवा

पुणे. : देशाची लोकसंख्या १४० कोटींहून अधिकचा आकडा ओलांडत असताना तळागाळातील नागरिक कार्यक्षम व प्रभावी आरोग्य सेवेपासून वंचित राहू नयेत या उद्देशाने पुण्यातील अभय व मनश्री अगरवाल या दाम्पत्याने ‘क्लिनिक्स ऑन क्लाऊड’ या आरोग्य एटीएमच्या संकल्पनेच्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे. या आरोग्य एटीएमद्वारे केवळ १० मिनिटांत एआय प्रणालीद्वारे प्रतिबंधात्मक आरोग्यसेवेअंतर्गत तब्बल ६५ हून अधिक आरोग्य चाचण्या करणे शक्य असून त्याचे रिपोर्ट्स हे देखील लागलीच उपलब्ध होत असल्याने या आरोग्य एटीएमद्वारे ग्रामीण भागात टेलीमेडिसिन अधिक प्रभावीपणे वापरणे शक्य होणार असल्याची माहिती आरोग्य एटीएम या संकल्पनेचे जनक आणि ‘क्लिनिक्स ऑन क्लाऊड’चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी अभय अगरवाल यांनी दिली.
या आरोग्य एटीएमच्या स्टार्ट अप विषयी अधिक माहिती देण्यासाठी पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत अगरवाल यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला. ‘क्लिनिक्स ऑन क्लाऊड’च्या सहसंस्थापिका आणि व्यवस्थापकीय संचालिका मनश्री अगरवाल, या आरोग्य एटीएमच्या वितरण व्यवस्थेचे महाराष्ट्रातील काम पाहणाऱ्या डायनाब्लेझ कंपनीचे अजय ढुमणे हे देखील यावेळी उपस्थित होते.
या आरोग्य एटीएमच्या संकल्पनेविषयी अधिक माहिती देताना अभय अगरवाल म्हणाले, “ग्रामीण भारतात आजही अपेक्षित असलेली आरोग्य यंत्रणा पोहोचलेली दिसत नाही. अनेक ठिकाणी डॉक्टर्स आहेत मात्र त्यांना आवश्यक चाचण्या करण्याची सुविधा सहज उपलब्ध होताना दिसत नाही, अनेक ठिकाणी सुविधा असली तरी चाचण्यांचा परिणाम लागलीच उपलब्ध होत नसल्याने तातडीने निदान करणे अनेकदा शक्य होत नाही. या पार्श्वभूमीवर ‘क्लिनिक्स ऑन क्लाऊड’ या संकल्पनेद्वारे आम्ही हे आरोग्य एटीएम उपलब्ध करून दिले असून याद्वारे केवळ १० मिनिटांत रुग्णाच्या आजाराचे निदान करणाऱ्या तब्बल ६५ हून अधिक चाचण्या करता येणार आहेत. विशेष म्हणजे एआयचा वापर करीत तयार करण्यात आलेल्या या एटीएमच्या चाचण्यांचे परिणाम हे ९५% हून अधिक योग्य असून ते लागलीच उपलब्ध होत असल्याने याचा फायदा रुग्ण आणि डॉक्टर दोहोंनाही होऊ शकणार आहे.”
पॅथलॅबमध्ये ज्या चाचण्या करण्यासाठी रुग्णांना ३५०० ते ४००० रुपये इतका खर्च येतो त्याच चाचण्या या एटीएमद्वारे ५०० ते १५०० रुपयांत करता येणार असून याद्वारे प्रतिबंधात्मक आरोग्य सेवेच्या क्षेत्रात सकारात्मकता येत असल्याचेही अगरवाल यांनी नमूद केले. याविषयी बोलताना ते पुढे म्हणाले की, “हे आरोग्य एटीएम वीज आणि इंटरनेट यांशिवाय कार्यरत राहत असून यामध्ये १९ प्राथमिक चाचण्यांसह ह्दयरोग, मधुमेह, रक्तदाब, हिमोग्लोबिन, एचबीएवनसी, मानसिक आरोग्य, फुफुसांशी संबंधीत विकार, डोळ्यांची तपासणी, कान, दात, त्वचा, किडनी यांच्याशी संबंधित चाचण्या होऊ शकणार आहेत. याबरोबरच डेंग्यू, मलेरिया, कोविड, एचआयव्ही, टायफॉईड, चिकनगुन्या यांसाठीच्या विकारांच्या रॅपिड चाचण्या करणे देखील शक्य आहे, असे मनश्री अगरवाल यांनी नमूद केले.
या एटीएममध्ये वापरण्यात आलेल्या सर्व यंत्रणा या जागतिक दर्जाच्या प्रमाणीकरणाद्वारे तयार करण्यात आल्या असून आयएसओ व सीडीएससीओकडून मान्यताप्राप्त असल्याने रुग्णांच्या माहितीच्या सुरक्षिततेसह, विश्वासार्हता यांचीही हमी देतात. या एटीएमचा वापर हा ग्रामीण भागात सरकारी, खाजगी रुग्णालये, दवाखाने, आशा वर्कर्स, यांद्वारे करता येणे शक्य असून हे मशीन भाडेतत्त्वावर, इएमआयवर देखील विकत घेता येऊ शकत असल्याने ग्रामीण भागातील रोजगारनिर्मितीला देखील चालना मिळू शकते, अशी माहिती अजय ढुमणे यांनी दिली.
एकदा चाचण्यांचे परिणाम हातात आले की ग्रामीण भागातील रुग्णांना त्यांच्या आवश्यकतेनुसार व पसंतीप्रमाणे शहरातील डॉक्टरांना तात्काळ मेल व व्हॉट्स अपवर रिपोर्ट पाठविणे शक्य होते. पुढील उपचार हे या यंत्राच्या टेलिमेडिसन तंत्रज्ञानाद्वारे थेट डॉक्टरांशी बोलून तातडीने सुरु करणे अधिक सुलभ होणार आहे. सद्य परिस्थितीत भारतात १५० हून अधिक शहरात तसेच ७ देशांमध्ये ३००० हून अधिक आरोग्य एटीएम कार्यरत असून ८o लाखांहून अधिक रुग्णांनी आजवर त्याचा वापर केला असल्याची माहिती अजय ढुमणे यांनी यावेळी दिली.