पिंपरी-चिंचवड शहरात ‘‘अबकी बार 100 पार..’’ चा केला संकल्प- आमदार महेश लांडगे आवाहन
विकासाभिमुख हिंदुत्वाचा विचार, म्हणून भाजपा पुन्हाचा निर्धार!

पिंपरी-चिंचवड पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६च्या पार्श्वभूमीवर आमदार महेश लांडगे यांनी शहरवासीयांना नवीन वर्षाच्या शुभेच्छांसह भारतीय जनता पार्टीला पाठिंबा देण्याचे आवाहन केले आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर सविस्तर ‘व्हीडिओ’ पोस्ट केला आहे.त्यामध्ये शहरातील प्रमुख विकासकामांचा आढावा घेत आगामी काळात शाश्वत विकासासाठी भाजपाला पुन्हा साथ द्या, असे भावनिक आवाहन केले आहे.
आमदार लांडगे यांनी २०१७ पासून पिंपरी-चिंचवडमध्ये सुरू झालेल्या विकासप्रक्रियेचा उल्लेख करत मेट्रो, नदी सुधार प्रकल्प, वेस्ट-टू-एनर्जी, आयआयएम, सीओईपी, स्पोर्ट्स सिटी, ग्रीन सिटी आणि रेसिडेन्शियल कॉरिडॉर यांसारख्या प्रकल्पांची माहिती दिली. “शहरात ‘देवेंद्र पर्व’ सुरू झाले असून अनेक प्रकल्प मार्गी लागले आहेत. काही प्रकल्प पूर्णत्वाच्या दिशेने तर काही प्रगतीपथावर आहेत,” असे त्यांनी नमूद केले.
राज्य आणि केंद्रात भाजपाचे सरकार असल्याने आगामी काळात शहरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अधिक बळ मिळेल, असा दावा त्यांनी केला. “शहरातील निर्णय शहरातच व्हावेत, या भूमिकेतून महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आले आहेत,” असेही पत्रकात म्हटले आहे.
नवीन वर्षाच्या निमित्ताने नागरिकांनी विकासाला मत देत भाजपाच्या अधिकृत उमेदवारांना प्रचंड बहुमताने निवडून द्यावे, असे आवाहन करत त्यांनी “एक मत शहराच्या विकासात योगदान देणारे ठरेल,” असे प्रतिपादन केले. तसेच विकासाभिमुख हिंदुत्वाच्या विचाराने शहर उज्ज्वल भविष्याकडे नेण्याचा संकल्प करण्याचे आवाहन त्यांनी केले. शेवटी आमदार लांडगे यांनी नागरिकांना पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत “आपला पक्ष—भाजपा आणि आपला उमेदवार—‘कमळ’,” असा संदेश दिला आहे.
प्रतिक्रिया :
“भाजपा सत्ताकाळात पिंपरी-चिंचवडच्या विकासाचा प्रवास हा केवळ घोषणांचा नव्हे, तर प्रत्यक्ष कामांचा आहे. मेट्रोपासून शिक्षण, पर्यावरण, क्रीडा आणि पायाभूत सुविधांपर्यंत सुरू असलेली विकासाची चक्रे ही विश्वासातून निर्माण झाली आहेत. हा विश्वास अधिक बळकट करत, शहराच्या प्रत्येक नागरिकाच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी पुढील पाच वर्षेही समर्पित भावनेने काम करण्याचा आमचा ठाम निर्धार आहे. कारण, विकासासाठी भाजपाशिवाय पर्याय नाही आणि शहराचे उज्ज्वल भविष्य हे आपले सामूहिक ध्येय आहे.”
– महेश लांडगे, आमदार, भाजपा, पिंपरी-चिंचवड, पुणे.


