प्रभागातील सर्वांगीण विकासासाठी सुजाता शेट्टींना संधी द्या – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, ता. ७ : प्रभागात वर्षानुवर्षे सुरू असलेली ठराविक लोकांची मक्तेदारी, वाढती वाहतूक कोंडी, झोपडपट्ट्यांचे प्रलंबित प्रश्न आणि पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या सर्व समस्यांवर तोडगा काढायचा असेल तर प्रभागात बदल घडवून आणणे गरजेचे आहे. त्यामुळेच प्रभाग क्रमांक २४ (ब) मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार सुजाता सदानंद शेट्टी व प्रभाग २४ व १३ प्रभागातील इतर उमेदवारांना मतदान करून निवडून देण्याचे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बुधवारी केले.
सुजाता शेट्टी विविध उमेदवारांच्या प्रचारार्थ मंगळवार पेठेतील नरपतगिरी चौक येथे भव्य जाहीर संकल्प सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला पॅनल प्रमुख सदानंद कृष्णा शेट्टी, पक्षाचे अधिकृत उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक उपस्थित होते. सभेत उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.
पवार म्हणाले की, ज्यांनी आतापर्यंत विकासाची कामे केली नाहीत, त्यांना पुन्हा महापालिकेत पाठवण्याचे काहीच कारण नाही. केवळ भाषणे करून किंवा आरोप-प्रत्यारोप करून विकास होत नाही, तर प्रत्यक्ष कामे करावी लागतात. पुण्यासारख्या वेगाने वाढणाऱ्या शहरासाठी सक्षम, प्रामाणिक आणि काम करणारे प्रतिनिधी महापालिकेत असणे आवश्यक आहे. निधी आणण्याचे काम माझे आहे, मात्र तो निधी योग्य पद्धतीने वापरून नागरिकांच्या प्रश्नांची सोडवणूक करणारे लोकप्रतिनिधी असणे तितकेच महत्त्वाचे आहे.
वाहनतळांची तीव्र समस्या, पिण्याच्या पाण्याची अपुरी व्यवस्था, अरुंद रस्त्यांमुळे निर्माण होणारी वाहतूक कोंडी, झोपडपट्टी पुनर्वसनासारखे महत्त्वाचे प्रश्न प्रभागात अद्याप प्रलंबित आहेत. हे प्रश्न सोडवण्यासाठी ठोस नियोजन आणि सातत्याने पाठपुरावा करण्याची गरज आहे. शाहू, फुले, आंबेडकर यांच्या विचारांना केंद्रस्थानी ठेवून समाजातील प्रत्येक घटकाचा विचार करत राष्ट्रवादी काँग्रेस काम करत असल्याचेही पवार यांनी स्पष्ट केले.
सुजाता शेट्टी या शब्दाला पक्क्या असून विकासासाठी सातत्याने काम करणाऱ्या उमेदवार आहेत. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी, नागरिकांच्या मूलभूत सुविधा सक्षम करण्यासाठी आणि पुणे शहराला पुढे नेण्यासाठी त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देणे आवश्यक आहे, असे आवाहन पवार यांनी यावेळी उपस्थित नागरिकांना केले.


