लायन शंतनु सिद्धा स्मृतीप्रित्यर्थ तिसरी ‘लायन्स् प्रौढ करंडक’ टी-२० क्रिकेट २०२५ स्पर्ध
दिक्षीत रॉयल्स्, रायगड वॉरीयर्स संघांची विजयी घौडदौड !!

येवलेवाडी येथील ब्रिलीयंट्स स्पोटर्स अॅकॅडमी मैदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत सचिन कापडे याने केलेल्या अचूक गोलंदाजी आणि इतर गोलंदाजांची साथ यामुळे दिक्षीत रॉयल्स् संघाने एलिट क्रिकेट क्लबचा सात गडी राखून सहज पराभव केला. पहिल्यांदा खेळणार्या एलिट क्रिकेट क्लबचा डाव दिक्षीत रॉयल्स् संघाच्या गोलंदाजांनी ५९ धावांवर गुंडाळला. सचिन कापडे या मध्यमगती गोलंदाजाने केवळ एक धाव देत, दोन षटके निर्धाव टाकून ४ गडी बाद केले. सचिनला सुरेश जैस्वाल याने तीन गडी तर, पराग चितळे याने दोन गडी बाद करून उत्तम साथ दिली. हे माफक लक्ष्य दिक्षीत रॉयल्स्ने ६.२ षटकात पूर्ण केले. विवेक देशमुख याने २० धावा करून संघाला सहज विजय मिळवून दिला. पंकज पाटील आणि सिकंदर पाटील या दोघांच्या अर्धशतकी खेळीमुळे रायगड वॉरीयर्स संघाने जेडब्ल्युडी मॅगीशियन्स्चा ४४ धावांनी पराभव करून विजयांची हॅट्ट्रीक नोंदवली. पहिल्यांदा फलंदाजी करताना रायगड वॉरीयर्सने १६६ धावांचे लक्ष्य उभे केले. यामध्ये पंकज पाटील याने ५३ धावांची तर, सिकंदर पाटील याने नाबाद ५७ धावांची खेळी केली. या दोघांनी तिसर्या गड्यासाठी ६३ चेंडूत ८८ धावांची भागिदारी रचून संघाला मोठी धावसंख्या उभी करण्यास मदत केली. या लक्ष्याचा पाठलाग करताना जेडब्ल्युडी मॅगीशियन्स्चा डाव १२२ धावांवर मर्यादित राहीला.
सामन्याचा संक्षिप्त निकालः गटसाखळी फेरीः
एलिट क्रिकेट क्लबः १२ षटकात १० गडी बाद ५९ धावा (संजय भिलारे २१, सचिन कापडे ४-१, सुरेश जैस्वाल ३-२६, पराग चितळे २-१०) पराभूत वि. दिक्षीत रॉयल्स्ः ६.२ षटकात ३ गडी बाद ६० धावा (विवेक देशमुख २०, महेंद्र जगताप ११, जगन्नाथ यादवटे १-१८); सामनावीरः सचिन कापडे;
रायगड वॉरीयर्सः २० षटकात ६ गडी बाद १६६ धावा (पंकज पाटील ५३ (३६, ९ चौकार, १ षटकार), सिकंदर पाटील नाबाद ५७ (५०, ४ चौकार, ३ षटकार), केतन कुर्वाळकर २-३४); (भागिदारीः तिसर्या गड्यासाठी पंकज आणि सिकंदर यांच्यामध्ये ८८ (६३) वि.वि. जेडब्ल्युडी मॅगीशियन्स्ः १८.२ षटकात १० गडी बाद १२२ धावा (नौशाद खान २८, नितीन सामल २० सोमनाथ काटके १९, विक्रम कैया २-१४); सामनावीरः पंकज पाटील.